Bihar Political Crisis: इकडे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा शपथविधी पार पडला. पण, तिकडे बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दल(RJD) सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज जनता दल यूनायटेड(JDU)ची बैठक पार पडली, या बैठकीत भाजपसोबतची युती तोडण्यावर निर्णय झाला.
गेल्या काही काळापासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद सुरू होते. नितीश कुमार भाजपची साथ सोडणार अशी चर्चा होती, ती चर्चा आज अखेर खरी ठरली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. आता सीएम नितीश कुमार आरजेडी, डावे आणि काँग्रेस या महाआघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत. सायंकाळपर्यंत ते राज्यपालांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये 'ऑपरेशन रिव्हर्स लोटस'भाजप आणि जदयुची युती तुटल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला. बिहारमध्ये सध्या ऑपरेशन रिव्हर्स लोटस सुरू आहे,अशी टीका त्यांनी केली. याशिवाय, लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्या यांनीदेखील ट्विट करत सत्ता स्थापनेबाबत मोठे संकेत दिले. 'राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं लालटेनधारी', अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.
यामुळे सुरू झाला वाद2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत 43 जागांपर्यंत मर्यादित राहिलेल्या JDU ला मुख्यमंत्रिपद दिल्यानंतर भाजपची वृत्ती नितीश कुमार यांना कधीच आवडली नाही. भाजप आणि जदयू वेगवेगळ्या मुद्द्यांवर अनेकदा आमने-सामने आले. यातच माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी ‘चिराग मॉडेल’बाबत ज्या पद्धतीने भाष्य केले, त्यामुळे जडयू वेगळ्या वाटेवर निघाल्याचे निश्चित झाले.