Prashant Kishor On Nitish Kumar:बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली असून, आज ते लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. नितीश कुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार आणि बिहार राजकारणाचे निरीक्षक प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
'एनडीएला जनादेश दिला होता'माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, 'नितीश कुमार यांच्या निर्णयाचा 2024च्या लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम पडेल, हे जदयू-राजदच्या भविष्यातील कामगिरीवर अवलंबून आहे. त्यांनी चांगले काम केले तर विरोधकांची शक्ती वाढेल आणि त्यांनी सरकार नीट चालवले नाही तर नुकसान होईल. ही वेळ 2015 पेक्षा खूप वेगळी आहे. 2015 मध्ये लोकांसाठी हा एक नवीन प्रयोग होता, आता तसे काही नाही. एनडीएला जनादेश देण्यात आला होता, मात्र आता नवी आघाडी तयार झाली आहे.'
नितीश कुमार यांची घसणरते पुढे म्हणाले की, 'मी याला संधीसाधू युती म्हणत नाही, फक्त वस्तुस्थिती सांगत आहे. नितीश कुमार यांनी स्वतःला पंतप्रधानपदासाठी कधीच उमेदवार मानले नाही. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे असे म्हणणे नाही. ही शक्यता फक्त माध्यमांमध्ये सांगितली जात आहे. पंतप्रधान होणे तर दूरची गोष्ट, या पदाचा उमेदवार होणे हे लोकप्रियतेवर अवलंबून असते. 2010च्या नितीशकुमार आणि आताच्या काळात खूप फरक आहे. 2010 मध्ये त्यांचे 117 आमदार होते, 2015 मध्ये 72 आणि आता फक्त 40च्या आसपास झाले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या भूमिका बदलल्या आहेत.'
'सरकारने अंजेडा सांगावा'नवीन सरकारला सल्ला देताना पीके म्हणाले, 'हे सरकार कोणत्या अजेंड्याखाली, कोणत्या जाहीरनाम्याखाली चालणार हे त्यांनी सांगावे. दोन्ही पक्षांनी एकत्र येताना कोणत्या मुद्द्यांवर काम करणार हे जनतेला समजले पाहिजे.' जनतेवर अन्याय झाला का? यावर पीके म्हणाले, 'नेत्याने पक्ष बदलला किंवा न बदला, लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांची हरकत नसते. हे पाऊल काहींच्या नजरेत नैतिकदृष्ट्या योग्य असेल किंवा नसेल, परंतु जमिनीवर काम केले जात आहे की नाही हे महत्वाचे आहे.' असेही ते म्हणाले.