बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जदयू अध्यक्ष नितीश कुमार आज दुपारीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना भाजपासोबत सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी लालुप्रसाद यादवांनी मिशन १६ सुरु केले असून ते हाणून पाडण्यासाठी भाजपाने काँग्रेसचे १० आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. संख्याबळ पाहता नितीशकुमारांना सत्तेसाठी रस्सीखेच करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विनोद तावडे बिहारमध्ये पोहोचले! आज रात्रीच भाजपा नितीशकुमारांना समर्थन देणार; दोन उपमुख्यमंत्री
नितीशकुमारांनी आज आणि उद्याचे सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी १२२ चा बहुमताचा आकडा गाठणे महत्वाचे आहे. हा आकडा पार करण्यासाठी भाजपा काँग्रेसच्या १० आमदारांच्या संपर्कात आहे. हे १० आमदार नितीशकुमार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
कोणाचे संख्याबळ किती? बिहार विधानसभेत भाजपाकडे ७८ जागा आहेत. जदयूकडे ४५ आमदार आहेत. तर एनडीएचा सहकारी पक्ष हमकडे ४ आमदार आहेत. हे संख्याबळ १२७ होते. लालूंनी जेडीयूचे नाराज आमदार फोडण्यास सुरुवात केली आहे. ही संख्या १६ असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जर सत्ता स्थापन करताना अडचण आली तर काँग्रेसचे १९ पैकी १० आमदार नितीश कुमारांना साथ देऊ शकतात अशी तयारी भाजपाने केली आहे.
पशुपती पारस, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांना किंवा त्यांच्या नेत्यांना बडी मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. नितीश आणि कुशवाह एकत्र राहिल्यास लोकसभा आणि येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा भाजपाचा अंदाज आहे.