नवी दिल्ली - नितीश कुमार यांनी मोठ्या शिताफीने सत्तांतर घडवून आणत बिहारच्या राजकारणात भाजपाला राजकीय वनवासात पाठवले आहे. तर पुन्हा एकदा आरजेडीसोबत आघाडी करत महाआघाडीला भक्कम केलं आहे. दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज तक आणि सी-वोटर यांनी केलेल्या सर्वेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेनुसार बिहारमध्ये आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची दाणादाण उडणार असून, महाआघाडी जोरदार मुसंडी मारणार आहे.
या सर्व्हेमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये एनडीएला प्रचंड मतदान झाले होते. भाजपा आणि एनडीएला तब्बल ५४ टक्के मते मिळाली होती. मात्र २०२२ च्या ऑगस्टमध्ये हा आकडा घटून ४१ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तीन वर्षांत एनडीएचं १३ टक्के मतांचं नुकसान झालं आहे. तर एनडीएला झालेल्या नुकसानाचा थेट फायदा महाआघाडीला होताना दिसत आहे. महाआघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३१ टक्के मतं मिळाली होती.
मात्र आता बदललेल्या समीकरणांचा थेट फायदा महाआघाडीला होताना दिसत आहे. महाआघाडीला ४६ टक्के मते मिळतील. म्हणजेच सुमारे १५-१६ टक्के अधिकची मतं महाआघाडीला मिळतील. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत ३९ जागा जिंकणाऱ्या एनडीएला आता लोकसभा निवडणूक झाल्यास केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीला तब्बल २६ जागा मिळू शकतात.
दरम्यान, बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठीही मतदारांनी धक्कादायक पसंती नोंदवली आहे. बिहारमधील तब्बल ४३ टक्के मतदारांनी मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर २४ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या नावाला पसंती दिली आहे, तर १९ टक्के मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पसंती दिली आहे.