पटना – बिहारमध्ये सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar) आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्र पक्ष भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून असलेले विधानसा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना घटनाबाह्य सभागृहाचं कामकाज चालवत असल्याचा आरोप केला. नितीश कुमार यांनी सदनातच आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या जेडीयू पक्षाच्या आमदारांनीही भाजपाविरोधात उघडपणे भाष्य केले.
जेडीयू आणि भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या या घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. जेडीयूचे प्रवक्ते जाहीरपणे भाजपाविरोधात भाष्य करत आहेत. सोशल मीडियावरही दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात हल्लाबोल करत आहेत. जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी भाजपाला इशारा देताना म्हटलंय की, उत्तर प्रदेश विधानसभेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या विजयामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये अतिआत्मविश्वास आला आहे. तो योग्य नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच काठी इतकीही वाकवू नका जेणेकरून ती मोडेल. कारण ही काठी मोडली तर तुटेल आणि सगळं काही संपेल. त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. इतक्यावरच जेडीयू प्रवक्ते थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, आत्मविश्वास चांगला आहे परंतु अतिआत्मविश्वास विनाशाचं कारण बनतो. भाजपानं त्यांची रणनीती बदलली नाही तर जेडीयू आणि भाजपा आघाडी जास्त दिवस टिकणार नाही असा इशाराच जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी दिला आहे.
विधानसभेत काय घडलं?
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर मंगळवारी विधानसभा सभागृह सुरु झाल्यानंतरही अध्यक्ष विजय कुमार सिन्हा स्वत: आले नाहीत. सदनाची कार्यवाही करण्यासाठी भाजपा आमदार प्रेम कुमार तालिका अध्यक्षपदावर बसले. सभागृह सुरू झाल्यानंतर आरजेडी आमदारांनी मुख्यमंत्रीविरुद्ध विधानसभा अध्यक्ष मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. तेव्हा संसदीय कार्यमंत्री विजय चौधरी यांनी लोकप्रतिनिधी आणि कार्यकारी मंडळ यांची जबाबदारी वेगळी आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान करायला हवा. विधानसभा अध्यक्षही घटनेला धरून कामकाज चालवत आहेत. मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांच्यात विरोधाभास नाही. विधानसभा अध्यक्ष पद सर्वोच्च आहे. सदन नियमाप्रमाणे चालावे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. दोन्ही घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्ती एकच बोलत आहेत असं सांगत सावरण्याचा प्रयत्न केला.