पाटणा: लोक जनशक्ती पक्षात फूट पडल्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांना धक्का देत त्यांचे काका आणि खासदार पशुपती पारस यांनी लोकसभेत पक्षाचं गटनेतेपद मिळवलं. त्यामुळे पासवान यांना धक्का बसला. या सगळ्या राजकीय घडामोडींमागे सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) असल्याचं बोललं जातं. लोजपला धक्का दिल्यानंतर आता जेडीयूनं काँग्रेसला झटका देण्याची तयारी सुरू केली आहे.
बिहारच्या राजकारणात सध्या ऑपरेशन काँग्रेसची चर्चा आहे. काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या एका मंत्र्यांवर जेडीयूनं ऑपरेशन काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १९ उमेदवार विजयी झाले. पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन टाळायचं असल्यास जेडीयूला १३ काँग्रेस आमदारांना गळाला लावावं लागेल. काँग्रेसचे १९ पैकी १० आमदार जेडीयूमध्ये जाण्यास तयार असल्याचं समजतं.
विधानसभेतील पक्षाच्या एकूण आमदार संख्येपैकी दोन तृतीयांश आमदारांनी पक्ष बदलल्यास कोणतीही तांत्रिक अडचण येत नाही. अशा परिस्थितीत पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळेच १९ पैकी १३ आमदारांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित, काँग्रेसी कुटुंबाशी नातं असलेलं आणि पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार पक्ष सोडण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे जेडीयूनं एका खासदाराकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. हा खासदार त्याच्या जातीच्या आमदारांशी संवाद साधून त्यांना जेडीयूमध्ये आणण्याच्या प्रयत्नात आहे.