Bihar Politics CM Nitish Kumar: नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने आज बिहार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. पण फ्लोअर टेस्टच्या वेळी बराच गदारोळ झाला. गदारोळ इतका वाढला होता की, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून बाहेर पडले. त्याचवेळी, फ्लोर टेस्ट दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. नितीश यांनी तर २०२० मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपाने त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला असा दावा त्यांनी केला. तसेच, त्यांनी आपल्या भाषणात भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख केला.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या महागठबंधन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांनी मतदान घेण्याची मागणी केली होती. तर भाजपाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर होत असताना मतदानाची काय गरज असल्याचे म्हटले होते. मात्र मतदान झाले आणि भाजपाने मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानात नितीश यांच्या बाजूने १६० मते पडली. त्यानंतर नितीश कुमार यांनी भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
"भाजपा सोडल्यानंतर देशभरातील पक्षांच्या लोकांनी मला फोन करून हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊल लढा दिला तर २०२४ ची निवडणूक नक्कीच आपण जिंकू. दिल्लीतून काहीही केले जात नाही, केवळ प्रसिद्धी केली जाते. आणि इथे सामान्य लोकांचे उत्पन्न कमी होते. भाजपाने जेडीयू आणि जुन्या नेत्यांना बाजूला करण्याचा कट रचला. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा आजारी पडले, तेव्हा लालकृष्ण अडवाणींना बळ देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही", अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीवर टीका केली.
"नंदकिशोर यादव यांना विधानसभेचे अध्यक्ष करतील, असे भाजपाने आधी सांगितले होते. मात्र त्यानंतर विजय सिन्हा यांना हे पद देण्यात आले. २०२० मध्ये आम्ही सांगितले होते की जर भाजपाने जास्त जागा जिंकल्या आहेत, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा. पण माझ्यावर दबाव आणून मला CM पदी बसवण्यात आले", असा दावा नितीश कुमार यांनी केला. ३२०२४ च्या निवडणुकीसाठी नितीश यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोलताना, "मला काहीही बनण्याची इच्छा नाही", असेही ते म्हणाले.