पाटणा - बिहारमध्ये अगदी शांतपणे सत्ता परिवर्तन झाले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांपासून विरोधी पक्षात असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाकडे पुन्हा सत्ता आली आहे. त्यामुळे राबडी देवी, तेज प्रताप आणि तेजस्वी यादव सध्या आनंदात आहेत. यामध्ये तेज प्रताप यादव आघाडीवर आहेत. तसेच नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सरकार बनवण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालंकडे जात असताना त्यांच्या सोबत तेजप्रतापसुद्धा होते. दरम्यान, आज राजभवनामध्ये नव्या सरकारचा शपथविधी झाला. तेव्हा राबडी देवी आणि तेजस्वी यदव यांच्या पत्नींसोबत तेजप्रताप यादव पहिल्या रांगेत होते. तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्यावेळी तेजप्रताप यांचा पारा चढला आणि त्यांनी प्रसारमाध्यमांवर भडकण्यास सुरुवात केली.
तापट स्वभावासाठी परिचित असलेले तेजप्रताप यावर आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात पहिल्या रांगेत होते. सोफ्यावर एका बाजूला तेजप्रतप यादव तर दुसऱ्या बाजूवा तेजस्वी यादव यांची पत्नी राजश्री बसली होती. तर मध्ये राबडी देवी बसल्या होत्या. तेवढ्यात प्रसारमाध्यमांनी राबडी देवी आणि त्यांची सून राजश्री यांच्याकडे धाव घेतली. तसेच तेजस्वी यादव यांच्या शपथविधीबाबत काय वाटते, अशी विचारणा केली. राजश्री ह्या जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी होत होत्या त्यामुळे माध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे होते. तेवढ्यात तेज प्रताप यादव यांचा पारा चढला.
एकीकडे शपथ ग्रहण सोहळ्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंचासमोर होत असलेला गोंधळ पाहून राजभवनातील मोठा अधिकारी धावत-पळत पुढे आला. त्याने प्रसारमाध्यमांना विनंती करून तिथून बाजूला केले. मात्र यादरम्यान, तेज प्रताप यादव यांचा पारा चढलेले होता. ते तोंडात पुटपुटत होते. तसेच प्रसारमाध्यमांना वारंवार आरएसएसचे एजंट म्हणत होते. त्यांचा मूड खूपच गरम झाला होता. जर अधिकाऱ्यांनी वेळीच येऊन हस्तक्षेप केला नसता तर परिस्थिती अधिकच बिघडली असती. दरम्यान प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथून निघून गेल्यावर प्रकरण शांत झाले.