Bihar Politics: गेल्या काही दिवसांमध्ये बिहारच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळाल्या. INDIA आघाडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) NDA सोबत आले अन् पु्न्हा एकदा मुख्यमंत्री झाले. आज(दि.12) बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावही नितीश सरकारने जिंकला. एनडीएच्या बाजूने 129 मते पडली. यावरुन निवडणूक रणनीतीकार आणि जन सूराजचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नितीश कुमारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
'नितीश कुमार मोठा चेहरा नाही'प्रशांत किशोर म्हणाले की, 'नितीश कुमारांना कोण विचारतो? ते बिहारचे आणि बिहारच्या जनतेचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हाला बोलावं लागतंय. नितीश कुमार कोण आहेत, हे इतर राज्यातील कुणाला माहीत आहे का? नितीशकुमार कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला काय देऊ शकतात? नितीशकुमार हा बिहारमध्ये इतका मोठा चेहरा नाही की, त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा उरलेली नाही.'
'नितीश पुन्हा पलटी मारणार''नितीश कुमार दर 6 महिन्यांनी पक्ष बदलतात. संपूर्ण देशात त्यांचे नाव पलटूराम आहे. शासनाच्या दृष्टिकोनातूनही बिहार हे सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे. इतर राज्यातील कोणीच बिहारला चांगले राज्य म्हणत नितीश कुमारांना नेता म्हणून स्वीकारणार नाही. नितीश कुमारांकडे फक्त 42 आमदारांचे भांडवल आहे.'
'त्यांच्याकडे ना राजकीय क्षमता आहे, ना राजकीय प्रतिमा, ना सुशासन. इंडिया आघाडीत काही मिळाले नाही, म्हणून ते मागच्या दाराने NDA कडे पळाले. आगामी बिहार विधानसभेपूर्वी राज्यातील समीकरण पुन्हा बदलेल. मी लिहून देतो, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.