पटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. फेविकॉल कंपनीचे लोक मला भेटले तर मी त्यांना नितीश कुमार यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा सल्ला देईन. कोणाचेही सरकार असले तरी ते खुर्चीला चिकटून राहतात, असे म्हणत प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची खिल्ली उडवली होती. यानंतर आता जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांनी प्रशांत किशोर यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. ते (प्रशांत किशोर) एक व्यापारी आहेच, आपले प्रोडक्ट लाँच करायचे आहे, असे ललन सिंह यांनी म्हटले आहे.
जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधताना आपल्याला कशाचीही चिंता नसल्याचे म्हटले आहे. तसेच, ते म्हणाले, "फक्त तुमचे स्वतःचे ब्रँडिंग करा. तुम्हाला तुमचे प्रोडक्ट बाजारात आणायचे असेल तर लाँच करत राहा, ते (प्रशांत किशोर) एक व्यावसायिक आहे. त्यांना कोण रोखत आहे? आजकाल ते (प्रशांत किशोर) कोणाचे काम करत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे."
याचबरोबर,"प्रशांत किशोर कधी-कधी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागतात आणि त्यानंतर ते आधी पत्रकारांना फोन करून सांगतात की, मुख्यमंत्री आम्हाला बोलवतील, आमची वाट पाहतील. आम्ही जाणार नाही. हे सर्व ब्रँडिंग आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही. बिहारमध्ये जिथे फिरायचे असेल तिथे फिरत राहा, ब्रँडिंग करत राहा, असेही ललन सिंह म्हणाले.
दरम्यान, यावेळी ललन सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सायकल योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मुला-मुलींना सायकल वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी ड्रेस योजना सुरू केली. जोपर्यंत मुली शिकत नाहीत, तोपर्यंत प्रजनन दर कमी होणार नाही, असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे. याशिवाय, आज बिहारचा प्रजनन दर 2.9 टक्क्यांवर गेला आहे, तर राष्ट्रीय सरासरी 2 टक्के आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 4 टक्क्यांवरून 2.9 टक्क्यांवर पोहोचलेला आहे. यामध्ये प्रशांत किशोर यांचे काही योगदान आहे का, असा सवाल ललन सिंह यांनी केला.