पाटणा - बिहारमध्ये कॅबिनेटचा विस्तार झाला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या कॅबिनेटच्या विस्तारासोबत काही आमदार नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे पाच आमदार मंगळवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. हे आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश कुमार हे २४ ऑगस्ट रोजी बहुमत सिद्ध करणार आहेत. मात्र तत्पूर्वीच काही आमदार नाराज असल्याने ते चांगले संकेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहारमध्ये मंगळवारी कॅबिनेटचा विस्तार झाला आहे. यामध्ये महाआघाडीच्या एकूण ३१ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कॅबिनेटमध्ये सर्वाधिक १६ मंत्रिपदे आरजेडीकडे गेली आहेत. तर जेडीयूच्या ११ जणांना मंत्रि बनवण्यात आले आहे. त्याशिवाय काँग्रेसचे २, हमच्या एक आणि एका अपक्ष आमदाराला मंत्रिपद देण्यात आले आहे.
दरम्यान, जेडीचूचे डॉक्रर संजीव (परबत्ता विधानसभा मतदारसंघ), पंकज कुमार मिश्रा (रुन्नीसैदपूर), सुदर्शन (बरबीघा), राजकुमार सिंह (मटिहानी) आणि शालिनी सिंह हे आमदार आजच्या शपथविधीला अनुपस्थित होते.
यामधील रायकुमार सिंह हे २०२० च्या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. मात्र नंतर ते जेडीयूमध्ये गेले होते. सध्या या आमदारांची नाराजी उघडपणे समोर आलेली नाही. शपथविधीबाबत शालिनी सिंह यांना विचारले असता त्यांनी सासूच्या उपचारांसाठी दिल्लीत असल्याचे सांगितले.