पाटणा: बिहारच्याराजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, सायंकाळी भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. एकूण 128 आमदारांचे समर्थन पत्र त्यांनी सादर केले आहे. आज सायंकाळी एकूण 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्र्यांची संभाव्य नावे समोर आली आहेत.
'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया
बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे. जेडीयू महाआघाडीपासून फारकत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहे. या सरकारमध्ये जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही समावेश असेल. नितीश कुमार आज संध्याकाळी राजभवनात 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश यांच्यासह 2 उपमुख्यमंत्री आणि 6 कॅबिनेट मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होणार असल्याची माहिती दिली. बिहारच्या नव्या एनडीए सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री असू शकतात, तर डॉ. प्रेम कुमार यांनाही मंत्रिपद मिळेल. याशिवाय, जेडीयूकडून विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमार, एचएएमकडून जितन राम मांझी यांचा मुलगा संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित सिंह हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.