Bihar Politics Tejashwi Yadav: बिहार विधानसभेत आज महाआघाडी सरकार विश्वासदर्शक ठराव सिद्ध करत आहे. यापूर्वी सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते यांनी आपापली मते मांडली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी विधानसभेत भाजपावर टीकास्त्र सोडले. "ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता येत नाही, जिथे भाजपा हरतो, तिथे ते तीन जावई पाठवतात. हे तीन जावई म्हणजे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स. या तिघांना अशा राज्यांमध्ये पुढे केले जाते", असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला.
"बिहारवर अन्याय झाला आहे, त्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाला सोडून देण्याचा हा निर्णय घेतला आहे. तो ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे भाजपा आम्हाला घाबरवेल हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही घाबरत नाही. आम्ही समाजवादाचे भाग आहोत आणि वंशज आहोत. त्यामुळे भाजपाने हवे तसे षडयंत्र केले तरीही आम्ही घाबरणार नाही. देशाचे तुकडे होऊ देणार नाही आणि समाजवाद संपू देणार नाही", असा विश्वास तेजस्वी यादवांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते तारकिशोर प्रसाद यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जनमताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. "नितीश कुमार पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेत सर्व काही विसरले आहेत. नितीश कुमार जेव्हा आमच्यासोबत आले होते, त्यावेळी राजदने त्यांच्यावर टीका करताना खूप काही बोल लावले होते. यानंतरही त्यांनी पुन्हा त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केले. नितीश कुमार खूप आतल्या गाठीचा माणूस असल्याचे अनेक लोक सांगतात. नितीशकुमार फक्त भोळे दिसतात, पण आता ते बिहारसाठी पल्टूकुमार आहेत, त्यांच्याकडे विश्वासार्हता शिल्लक राहिली नाही", अशी टोलेबाजी सभागृहात बोलताना भाजपाच्या तारकिशोर प्रसादांनी आधी केली.
"जनतेची इच्छा असेल नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकतात. नितीश कुमार पंतप्रधानांबाबत कोणत्याही संभ्रमात राहत नाहीत. पूर्वी आम्ही १२६ च्या बळावर बिहारची सेवा करत होतो, आता १६४ च्या बळावर बिहारची सेवा करत आहोत", असे जेडीयूच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी यांनी तारकिशोर प्रसाद यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले.