एसपी सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर पुन्हा मोठी उलथापालथ होऊ शकते. आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी ते हा निर्णय घेणार आहेत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा हे लोक शिवीगाळ करायचे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, म्हणूनच भाजपला संविधानाचा तिरस्कार आहे, असे ते म्हणाले.
लेकीसाठी लालू यादव उतरले प्रचारात
सातव्या टप्प्यात बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. अशा स्थितीत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी पाटलीपुत्र ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. येथे लालू यादव यांनी त्यांची मोठी मुलगी मीसा भारती यांना उमेदवारी दिली आहे. मीसा भारती यांचा विजय निश्चित करण्यासाठी लालू यादव यांनी स्वतः प्रचाराला सुरुवात केली आहे. लालू यादव मंगळवारी मीसा यांच्यासाठी मते मागण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे भाकीत केले.
४ जून रोजी इंडियाचे सरकार येणार
नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद जाणे निश्चित असल्याचे लालू यादव म्हणाले. ते म्हणाले की, देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आम्ही अवतार आहोत, असे मोदी सांगत आहेत, पण ४ जून रोजी निकालानंतर नेमके काय ते कळेल.
दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलेले लालू यादव आज मुस्लीम समाजाची सर्वांत मोठी इमारत शरिया येथे पोहोचले. यावेळी खानकाहमध्ये लालू यादव आणि पीर साहेब यांच्यात दीर्घ संवाद झाला. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.