नवी दिल्ली - बिहारमध्ये एक कौतुकास्पद घटना घडली आहे. एका प्राध्यापकाच्या इमानदारीची जोरदार चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसूल करतात. असं असताना या शिक्षकाने चक्क त्याला मिळालेला संपूर्ण पगार परत केल्याची घटना आता समोर आली आहे. ललन कुमार असं या प्राध्यापकाचं नाव आहे. बिहारच्या मुझफ्फरनगरमधील नितीश्वर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाने आपला संपूर्ण पगार परत केला आहे. यामागचं कारण ऐकल्यावर तुम्हीही त्यांचं भरभरून कौतुक कराल.
मिळालेल्या माहितीनुसार, ललन कुमार सप्टेंबर 2019 मध्ये महाविद्यालयात रुजू झाले होते. पण 33 महिन्यांत एकही विद्यार्थी वर्गात आला नाही. यामुळे ललन कुमार यांनी 33 महिन्यांमध्ये मिळालेला पगार म्हणजेच तब्बल 24 लाख रुपये परत केला आहे. काहीही न शिकवता हा पगार घेणं माझ्या तत्वांच्या विरोधात असल्याचं सांगत ललन कुमार यांनी पगार परत केला आहे. त्यांनी 23 लाख 82 हजार 228 रुपयांचा धनादेश बी आर आंबेडकर बिहार विद्यापीठात जमा केला आहे.
"माझा विवेक मला कोणतीही शिकवणी न देता पगार घेण्याची परवानगी देत नाही" असं ललन कुमार यांनी सांगितलं. तसेच ऑनलाइन शिकवणी घेत असतानाही काही मोजके विद्यार्थी उपस्थित असायचे. जर मी इतकी वर्ष काही न शिकवता पगार घेतला तर हे माझ्यासाठी शैक्षणिक मृत्यू झाल्यासारखं आहे असंही ते म्हणाले. मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि दोन वर्ष 9 महिन्यांचा पगार परत केल्याचंही सांगितलं. ललन कुमार यांचं सोशल मीडियावर देखील खूप कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.