बिहारच्या पूर्णियामध्ये लग्नाच्या एक दिवस आधी मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली. हळद आणि मेहंदीचे विधी पार पडले. यानंतर घरातून बाहेर आल्यानंतर तरुणी तिच्या प्रियकरासोबत गेली. मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, मात्र मुलीने पोलिसांसमोर येऊन अपहरणाचा गुन्हा नाकारल्यानंतर मुलीच्या भावाने पुतळा बनवून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. हे संपूर्ण प्रकरण टिकापट्टी गावाशी संबंधित आहे, जिथे एका तरुणीचं लग्न तिच्या भावाने ठरवलं होतं.
11 जून रोजी लग्न होणार होतं. मेहेंदी आणि संगीत यानंतर 10 जून रोजी हळदी समारंभ संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी मुलीची वरात येणार होती, मात्र ती रात्री प्रियकरासह पळून गेली. यानंतर घरात खळबळ उडाली. लोकांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही तेव्हा मुलीच्या भावाने पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्यांनी गावातील एका तरुणाला आरोपी बनवले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, सोमवारी मुलीने वधूच्या जोडीने टिकापट्टी पोलीस ठाणे गाठलं आणि अपहरणाचे प्रकरणच खोटं असल्याचं सांगितलं.
आपल्याला हे लग्न मान्य नव्हतं, त्यामुळे त्याला पळून जावं लागल्याचे तिने पोलिसांना सांगितलं. ज्या दिवशी तिचं लग्न होणार होतं, त्याच दिवशी तिने तिच्या प्रियकरासोबत मंदिरात लग्न केलं. त्यानंतर तरुणीच्या भावाची नाराजी वाढली. भाऊ म्हणाला की, त्याच्यासाठी त्याची बहीण आता कायमची मरण पावली आहे. कुटुंबीयांसह त्यांनी प्रथम आपल्या बहिणीचा पुतळा तयार केला आणि नंतर तिची अंत्ययात्रा काढली.
मुलीचा फोटोही लावला होता. पुतळा स्मशानभूमीत नेण्यात आला आणि नंतर पूर्ण विधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले. संतप्त भाऊ म्हणतो की, वडिलांच्या निधनानंतर त्याने कधीही कशाचीही कमतरता पडू दिली नाही. त्याने बहिणीला विचारून तिचे लग्न निश्चित केल्याचे सांगितले. तिने आधी सांगितले असतं तर हे सर्व घडलं नसतं. तिचं श्राद्ध ही ठरलेल्या तारखेला केले जाईल, असं सांगितलं. या प्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.