पाटणा - बिहारच्या राज्य मंत्रीमंडळातील एका भाजप नेत्याने रस्त्यावरील नमाज पठण बंद करण्याचा मागणीचे समर्थन केले होते. त्यावरुन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना, या गोष्टी निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, या विषयाला मुद्दा बनवण्यात काहीही अर्थ नाही. आमच्यासाठी सर्वच नागरिक एकसमान आहेत. सर्वांनी आपल्या पद्धतीने या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, असेही कुमार यांनी स्पष्ट केलं.
एखादा व्यक्ती कोठे पूजा-आरती करतो, गाणे गातो ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. सर्वांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपल्या पद्धतीने अनुकरण करावे हे मी मानतो. जेव्हा कोरोना काळात सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, तेव्हा सर्वच लोकं घरात होती. कुणीही रस्त्यावर नव्हते. आता, पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, सरकारने नवी नियमावली जारी केल्यास सर्वांना ते नियम लागू राहतील. हा कुठल्याही एका धर्माचा विषय नाही, असे स्पष्टीकरण नितीश कुमार यांनी दिले आहे.
ओमायक्रॉन विषाणूचा अद्याप एकही रुग्ण बिहारमध्ये आढळून आलेला नाही. मात्र, ओमायक्रॉनचा धोका कायम आहे, त्यामुळेच उपाय आणि खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या ओमायक्रॉन रुग्णाची पडताळणी होण्यास 5 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे, बिहारमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा ओमायक्रॉन संबंधित अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नितीश कुमार यांनी जनता दरबारात उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोना आणि ओमायक्रॉनबाबतही माहिती दिली. दरम्यान, सध्या पाटणा येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे.