बिहारमधील सीतामढी येथील इंदरवा गावात वरात आली होती. घरी लग्नाचा सोहळा होता. वधू पक्षानं वरातीचं स्वागत केलं. डीजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी नाचत होती. चहा आणि सरबताचा बेत होता. त्यानंतर काही वेळानं वधू व्यासपीठावर आली. वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातली. त्यानंतर नातेवाईकांनी वधू-वरांसोबत फोटो काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अचानक नवरदेव खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वराच्या मृत्यूनंतर विवाहसोहळा पार पडलेल्या घरात शोककळा पसरली. जिथं काही वेळापूर्वी लग्नाची खूप धामधूम होती तिथं आता स्मशान शांतता पसरली होती.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. डीजेच्या मोठ्या आणि दणदणाटामुळे तो आधी घाबरला, नंतर अस्वस्थ होऊन तो स्टेजवर कोसळळा. परिहारच्या मनीथर गावातील गुदर राय यांचा मुलगा सुरेंद्र कुमार असे मृताचे नाव आहे.
डीजेचा मोठा आवाज मृत्यूचे कारणसुरेंद्र कुमार याला स्टेजवर जाण्याआधीच डीजेच्या आवाजाचा त्रास होत होता. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अस्वस्थ वाटत होतं. त्यानं अनेकदा डीजे बंद करण्यासही सांगितलं. पण त्याच्यासमोर नाचणारी वऱ्हाडी मंडळी काही ऐकली नाहीत. त्यानंतर त्याची तब्येत बिघडू लागली आणि अचानक तो स्टेजवर बेशुद्ध पडला. स्टेजवर पडल्यानेच वराचा मृत्यू झाल्याचं लोक सांगतात. या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी या घटनेबाबत सांगितलं.