नवी दिल्ली - केस गळती या समस्येचा सामना अनेक जण सध्या करत आहेत. बरेचसे विविध उपाय करून काहीच फायदा होत नाही. त्यामुळे मग काही लोक हेअर ट्रान्सप्लान्ट करतात. पण आता हेअर ट्रान्सप्लान्ट करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. लग्नासाठी त्याने हेअर ट्रान्सप्लान्ट केलं. त्यानंतर 24 तासांतच त्याला मृत्यूने गाठल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. तरुणाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोरंजन पासवान असं या तरुणाचं नाव असून तो बिहार स्पेशल आर्म्ड पोलीसमध्ये (BSAP) कार्यरत होता.
मनोरंजनच्या डोक्याच्या पुढील भागावरील केस गळत होते, टक्कल पडलं होतं. पण 11 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. त्याआधी त्यांनी आपल्या डोक्यावर केस यावेत यासाठी हेअर ट्रान्सप्लान्ट करण्याचा महत्त्वाचा निर्णय़ घेतला. 9 मार्चला त्यांच्यावर हेअर ट्रान्सप्लान्ट करण्यात आलं. हेअर ट्रान्सप्लान्टनंतर तो पोलीस क्वार्टरमध्ये निघून गेला. रात्री अचानक त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. छातीत जळजळ जाणवू लागली. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या इतर पोलिसांनी त्याला हेअर ट्रान्सप्लान्ट केलेल्या त्या सेंटरमध्ये नेलं, तिथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
रूबन मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर एके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याची प्रकृती ही अत्यंत गंभीर होती. रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन, कार्डियक सर्जन, इंटरनल सर्जन आणि आयसीयूमधील सर्व तज्ज्ञांनी त्याच्यावर उपचार सुरू केला. पण त्यानंतर काही वेळातच कार्डियक अरेस्टने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर नेमकी माहिती समोर येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.