पाटणा - नितीशकुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपप्रणीत रालोआला बिहार विधानसभा निवडणुकीत 125 जागांवर विजय मिळाला. त्यात भाजपचा वाटा 73 जागांचा आहे. मात्र, असे असले तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. जदयुला कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याने टीकेचे धनी होणारे नितीश कुमार यांनीही, आपल्याला खुर्चीचा मोह नाही, जो निर्णय घ्यायचा असेल तो एनडीएच्या बैठकीत होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आज सायंकाळच्या कॅबिनेट बैठकीत नितीशकुमार यांनी बिहारमधील राज्य सरकार बरखास्त करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. यावेळी, विधानसभा बरखास्त करण्याची विनंतीही राज्यपालांकडे केली आहे. आता, लवकरच बिहारचे 7 वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा होईल.
नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने सध्या राज्याची जबाबदारी कोणाकडे हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, नितीशकुमार हेच काळजीवाहू मुख्यमंत्री बनून काम करणार आहेत. आता, 15 नोव्हेंबर रोजी एनडीएमधील नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत एनडीएच्या गटनेत्याचं नाव घोषित केलं जाणार आहे. तत्पूर्वी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार यांनी
नितीशकुमार यांनी प्रचारादरम्यान ही आपली अखेरची निवडणूक, असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार दिवाळीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारा नेता हा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला जाईल. आतापर्यंत हा विक्रम श्रीकृष्ण सिन्हा यांच्या नावावर आहे. सिन्हा तब्बल १७ वर्षे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होते. मात्र, आता नितीशकुमारांकडे हा बहुमान जाईल.