लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारमध्ये यंदाच्या बारावी परीक्षेत कला शाखेत गुणानुक्रमे राज्यात सर्वप्रथम आलेल्या गणेश कुमारच्या बौद्धिक गुणवत्तेसोबत बिहारच्या शालांत परीक्षा मंडळाची चालबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गुणवत्तेची क्षमता सिद्ध करता न आलेल्या गणेश कुमारला अटक करण्यात आली असून, त्याचा निकालही रद्द करण्यात आला. गणेश कुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा निकाल तात्काळप्रभावाने रद्द करण्यात आला आहे, असे बिहार शालांत परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी सांगितले. बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे, असे पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले.बिहार शालांत परीक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा ६५ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. तथापि, गणेश कुमार हा मात्र राज्यात सर्वप्रथम आल्याचे घोषित करण्यात आले. मानव्यविद्या शाखेत (कला) त्याला ८२.५ टक्के, संगीत विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत ७० पैकी ६५, तर लेखी परीक्षेत ३० पैकी १८ आणि हिंदी या विषयात १०० पैकी ९२ टक्के गुण मिळाले असून, तो गुणानुक्रमे राज्यात सर्वप्रथम आल्याचे घोषित करण्यात आले होते.मागच्या वर्षीही झाला होता टॉपर घोटाळामागच्या वर्षीही बिहारमधील टॉपर घोटाळा देशभरात गाजला होता. मानव्यविद्या शाखेत सर्वप्रथम आलेल्या रुबी रायच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यात आली असता तिने मूलभूत प्रश्नांना भलतीसलती उत्तरे दिल्याने निकालातील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मागच्या वर्षी १२ वी विज्ञान शाखेत सर्वप्रथम आलेल्या सौरव श्रेष्ठा याचीही विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना झालेली जाहीर फटफजिती देशभराने पाहिली होती.न वाद्य वाजविता आले, न सुरात गाता आलेया मागील वर्षीच्या टॉपर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बारावी परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या गणेश कुमारची शैक्षणिक गुणवत्ता पारखण्यासाठी चाचणी घेण्यात आली. त्याला संगीत विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. तसेच खरोखरच त्यालासंगीताची जाण खरेच आहे का? याची शहानिशा करण्यासाठी एखादे वाद्य वाजविण्यास आणि एखादे गाणे गाण्यास सांगण्यात आले. तथापि, त्याला धड वाद्य वाजविता आले नाही. तसेच गाणेही सूरतालात गाता न आल्याने त्याची हुशारी आणि बिहार शालांत परीक्षा मंडळाच्या बनवाबनवीचा पर्दाफाश झाला.वय लपविले, त्याला आहेत दोन मुलेतो ज्या शाळेतून संगीत या विषयासह परीक्षा देऊन राज्यात सर्वप्रथम आला, त्या शाळेत संगीत शिक्षणाच्या सुविधाही नाहीत. एवढेच नव्हे तर त्याने परीक्षेचा अर्ज भरताना वयही लपविले, असे मंडळाचे अध्यक्ष आनंद किशोर कुमार यांनी सांगितले. बिहार टॉपर घोटाळा; ईडीने दाखल केला गुन्हानवी दिल्ली : २०१६ मधील बिहार टॉपर्स घोटाळ्यातील कथित गैरप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. बिहार शालांत परीक्षा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि चार प्राचार्यांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कला शाखेत प्रथम आलेल्या रुबी राय या विद्यार्थिनीला मूळ प्रश्नांचे उत्तरे देता आली नव्हती. तसेच पॉलिटिकल सायन्स म्हणजे प्रॉडिगल सायन्स असे ती म्हणाल्याने तिच्या हुशारीचा पर्दाफाश झाला होता. बिहार शालांत परीक्षेतील घोटाळा देशभर गाजला होता. आरोपींचे लवकरच जबाब नोंदवून ईडी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची शक्यता आहे.
बिहारचा टॉपर गणेश कुमारला अटक
By admin | Published: June 03, 2017 3:58 AM