पाटणा : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात गुरुवारी कोर्टरुममध्ये घुसून दोन पोलिसांनी न्यायाधीशांवर हल्ला केला. या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत पाटणा उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस प्रमुखांना स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. गुरुवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.कोर्टरुममध्ये एका प्रकरणावर सुनावणी चालू असताना दोन पोलिसांनी आत घुसून झांझरपूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अविनाश कुमार यांच्यावर बंदूक रोखून त्यांना मारहाण केली.
न्या. अविनाश कुमार सुखरुप आहेत; परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने ते जाम हादरले आहेत. न्यायाधीशांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणारे वकील आणि कोर्टाच्या कर्मचाऱ्यांवरही ठाणे अधिकारी गोपाल कृष्णा आणि उपनिरीक्षक अभिमन्यू कुमार यांनी हल्ला करुन त्यांना जखमी केले. ही घटना धक्कादायक आणि अभूतपूर्व आहे, असे न्या. राजन गुप्ता आणि मोहीत कुमार शहा यांच्या खंडपीठाने म्हणत पोलीस प्रमुखांना २९ नोव्हेंबर रोजी बंद लखोट्यात या घटनेशी संबंधित स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याच दिवशी खंडपीठ पुन्हा सुनावणी घेणार आहे. पोलीस प्रमुखांना त्या दिवशी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
नोटीस जारीउच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण प्रथम सकृतदर्शनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचे दिसते, असे मत व्यक्त करुन राज्याचे मुख्य सचिव, बिहारचे पोलीस प्रमुख, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि मधुबनीच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केली. याच वर्षी सप्टेंबरमध्ये न्या. अविनाश कुमार यांनी छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपीला त्याच्याच गावांतील सर्व महिलांचे कपडे सहा महिने मोफत धुण्याचे आणि इस्री करण्याच्या अटीवर जामीन दिला होता.