बिहार - बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीन याच्या पुतण्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युसूफ असं शहाबुद्दीनच्या पुतण्याचं नाव असून सिवान जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (2 फेब्रुवारी) त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच युसूफला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री युसूफची हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. युसूफच्या हत्येनंतर रुग्णालयाबाहेर त्याच्या समर्थकांनी गर्दी केली. गोंधळ घातल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. युसूफच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
युसूफ हा बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनचा पुतण्या आहे. शहाबुद्दीनची बिहारमधील सिवान कारागृहातून तिहार कारागृहात रवानगी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिला होता. तसेच अनेक प्रकरणी खटला चालू असलेल्या मोहम्मद शहाबुद्दीनला कोणतीही विशेष वागणूक मिळू नये, तसेच योग्य आणि निष्पक्ष कारवाई व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला हा आदेश दिला होता. चंद्रकेश्वर प्रसाद उर्फ चंदा बाबू यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले होते. शहाबुद्दीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चंदा बाबू यांच्या तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. चंदा बाबू यांच्या दोन मुलांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने 2015 मध्ये शहाबुद्दीनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शहाबुद्दीन साक्षीदारांवर दबाव आणत असून खटल्याला वेगळं वळण देत आहे असा आरोप चंदा बाबू यांनी केला आहे.