पाटणा - एकीकडे देशात कोरोनाचा कहर वाढत असला तरी दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये एनडीए विरुद्ध यूपीए अशी लढत होणार असली तरी सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू असून, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. नितीश कुमार यांच्या कारभारावर बिहारमधील जनता नाराज असून, त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असा दावा करत लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चिराग पासवान यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील नितीश सरकार कशाप्रकारे काम करत आहे आणि राज्यातील कोरोना विषाणूच्या फैलावाची सत्य परिस्थिती काय आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली आहे. मात्र हे पत्र अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिराग पासवान यांनी या पत्रामध्ये लोकजनशक्ती पार्टीच्या बिहारमधील संसदीय समितीच्या बैठकीत मिळालेल्या प्रतिक्रियांचाही उल्लेख केला आहे. तसेच राज्यात प्रशासन कशाप्रकारे काम करत आहे, याचाही उल्लेख केला आहे. तसेच राज्यातील जनता बिहार सरकारच्या कामकाजावर तितकीशी समाधानी नसून, त्याचा परिणाम बिहार विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येईल, अशी शक्यता चिराग पासवान यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.दरम्यान, राज्यातील सत्ताधारी जनता दल युनायटेडच्या लोकप्रियतेबाबत माहिती घेण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाने १६ सप्टेंबर रोजी आपल्या खासदारांची बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयू आणि जेडीयूच्या नेत्यांसोबत असलेल्या मतभेदांबाबत चर्चा करण्यासाठी लोकजनशक्ती पार्टीने ही बैठक बोलावली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी