नवी दिल्ली : बिहारमध्ये जेडीयू- राजद- काँग्रेस महायुतीच्या तगड्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील रालोआने ५०० हून जास्त रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेतला. एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० ते २२ मोठ्या जाहीरसभा होणार आहेत.मोदी अनुभवी स्टार प्रचारक असून रालोआचा चेहराही बनले आहेत, कारण मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचेही नाव समोर करण्यात आलेले नाही. या राज्यातील जय-पराजयाचे श्रेय- अपश्रेयाचे राजकारण मोदींभोवतीच केंद्रित असणार आहे. आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौऱ्याहून २९ सप्टेंबर रोजी मायदेशी परतल्यानंतर दोनच दिवसात मोदी बिहार ढवळून काढायला जातील. मोदींनी याआधीच बिहारमध्ये चार प्रचारसभांना संबोधित केले आहेत. विदेश दौऱ्याहून परतताच २ आॅक्टोबर रोजी ते बांका येथे तर ४ आॅक्टोबर रोजी लखीसराय येथे प्रचारसभा घेतील. या दोन्ही मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १२ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. लोजपा, रालोसपा, हम या पक्षांचे नेते त्यांच्यासोबत राहतील. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळूनही बांकामध्ये विजय मिळविता आला नव्हता. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात विजयासाठी नवा आधार शोधावा लागेल. (वृत्तसंस्था)
मोदींच्या २० रॅलींनी बिहार ढवळून निघणार
By admin | Published: September 28, 2015 2:00 AM