गेल्या १७ वर्षांपासून तुरुंगाची हवा खात असलेल्या बिहारच्या नवादामधील एका बाहुबलीने रातोरात एका मंदिरात जात दिल्लीच्या महिलेशी लग्न केले आहे. पटनाच्या बख्तियारपूरमधील करौटा जगदंबा मंदिरात त्याने सात फेरे घेतले. याचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून चर्चाही होऊ लागली आहे.
सोशल मीडियावर लोक अशोक महातो यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देत आहेत. अनिता कुमारी ही दिल्लीची रहिवासी आहे. ती तिकडे नोकरी करत होती.
या लग्नानंतर स्थानिक लोकांमध्ये महातोचीच चर्चा आहे. ५६ वर्षीय महातो यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. १७ वर्षे तुरुंगातही काढली आहेत. यामुळे त्यांना कोणताही पक्ष तिकीट देण्याची शक्यता कमी होती. यावर तोडगा म्हणून त्यांनी ४५ वर्षीय महिलेसोबत रातोरात लग्न केले आहे. आता मला नको माझ्या बायकोला तिकीट द्या, असे म्हणत महातो लालू प्रसाद यांच्या राजदकडे तिकीट मागत आहे. मुंगेर लोकसभा मतदारसंघातून महातो पत्नीसाठी तिकिट मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. राजदच्या तिकीटावर अनिता लोकसभा लढवेल असे बोलले जात आहे.
नव्वदच्या दशकात नवादाच्या वारिसलीगंज व शेखपुरा भागात दोन कुख्यात गँग होत्या. यापैकी एक अशोक महातो यांची होती. त्यांच्याच वर्चस्वाची जोरदार लढाई सुरु असायची. २००२ मध्ये अशोक महातोच्या टोळीने प्रतिस्पर्धी अखिलेश सिंह याच्या गँगवर हल्ला केला. यात डझनभर लोकांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी महातोला १७ वर्षांचा कारावास झाला होता.