ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ५ - बिहार विधानसभेतील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी बारावाजेपर्यंत ३१.०८ टक्के मतदान झाले आहे. जदयूचे वरिष्ठ नेते बिजेंद्रप्रसाद यादव, राजदचचे अब्दुलबारी सिद्दीकी आदी दिग्गज नेत्यांसह ८२९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
बिहार विधानसभेतील पाचव्या व अंतिम टप्प्यात मधुबनी, सुपैौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, मधेपूरा, सहरसा आणि दरभंगा अशा नऊ जिल्ह्यातील ५७ जागांवर गुरुवारी मतदान होत आहे. १ कोटी ५५ लाख ४३ हजार ५९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारसंघांमध्ये निमलष्करी दल व पोलिसांच्या सुमारे १०३३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पाच टप्प्यात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी रविवारी ८ नोव्हेंबररोजी होणार आहे.
गुरुवारी मतदान सुरु झाल्यावर काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी समोर आल्या. दरभंगामधील बेनीपूरमधील मतदान केंद्रावर एका कर्मचा-याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.