ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.8 - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासहीत त्यांची मुलगी व जावईदेखील अडचणीत सापडले आहेत. लालूंची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेशदेखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. याच पार्श्वभूमीवर ईडीनं मिसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणि कंपन्यांवर छापा मारला आहे. एकूण तीन ठिकाणी छापा मारण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
तपास संस्थांच्या चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, मिसा आणि शैलेश यांच्या कंपनीनं एक दिवसात बँकमधून तब्बल 90 लाख रुपये ट्रान्सफर केले होते.
आणखी बातम्या वाचा
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रेल्वेमंत्री असताना केलेल्या कथित घोटाळ्यांप्रकरणी त्यांच्यासह यादव कुटुंबीय आणि हॉटेलच्या संचालकांवर सीबीआयने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. शिवाय लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापेही टाकण्यात आले.
सीबीआयच्या कारवाईनंतर शनिवारी ईडीनं त्यांची मुलगी मिसा व जावई शैलेश कुमार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा मारला. दरम्यान, शुक्रवारी सीबीआयकडून करण्यात आलेल्या कारवाईसोबत याचा काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण मिसा व शैलेश यांच्या बेहिशेबी संपत्तीसंदर्भातील आहे.
शनिवारी सकाळी ईडीनं मिसा भारती आणि शैलेश यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांवर छापा मारला. यातील दिल्लीतील इंदिरा गांधी एअरपोर्ट जवळील बिजवासन फार्महाऊसचाही समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिसा व शैलेशवर 8 हजार कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.
ED raid on Misa Bharti: Raids underway at 3 locations in Delhi. (visuals from Ghitorni and Sainik Farms) pic.twitter.com/KWf4cTzHOv— ANI (@ANI_news) July 8, 2017
ही भाजपाविरुद्ध बोलण्याची शिक्षा
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा आणि आरएसएसविरुद्ध बोलण्याची ही मला दिलेली शिक्षा आहे. मी कुणाला घाबरत नाही आणि भाजपाविरुद्ध विरोधकांना एकजूट करण्यासाठी काम करीतच राहीन. २७ ऑगस्टची पाटण्यातील रॅली आणखी जोमाने काढणार आहोत. आपल्याविरुद्धची कारवाई राजकीय द्वेषातून केली जात आहे, पण मी मागे हटणार नाही. भाजपा आणि मोदी सरकारला संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. - लालूप्रसाद यादव
कुणाविरुद्ध गुन्हा?
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव (६९) त्यांच्या पत्नी राबडी देवी, त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी सरला गुप्ता.
सुजाता हॉटेलचे दोन्ही संचालक विजय आणि विनय कोचर, चाणक्य हॉटेल, डिलाइट मार्केटिंग कंपनी (ही कंपनी आता लारा प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाते.) यांच्या मालकांवर, तत्कालीन आयआरसीटीसीचे मुख्य संचालक पी.के. गोयल.
फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकार, भाजपाचा संबंध नाही
या कारवाईशी सरकार वा भाजपाचा काहीही संबंध नाही. सीबीआय आपले काम करीत आहे. यात राजकीय सुडाची भावना कोठे दिसते? यात भाजपा कोठे दिसतो? जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध आरोप असतील, तर त्याची चौकशी केली जाऊ नये, असे वाटते की काय? पूर्वी नव्हते, इतके स्वातंत्र्य आता सीबीआयला आहे. यात हस्तक्षेप नाही. या कारवाईचा बिहारमधील राजद-जदयू आघाडीवर परिणाम होईल का, हे मला माहीत नाही. नितीशकुमार एक बुद्धिवान आणि परिपक्व व्यक्ती आहेत. काय करायचे, हे त्यांना चांगले माहीत आहे. - व्यंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री
हे सरकारच्या हातचे बाहुले
सीबीआय, ईडीसारख्या संस्था सरकारच्या हातातील बाहुले झाल्या आहेत. राजकीय विरोधकांविरुद्ध असे कट केले जात आहेत. लोकशाहीत असे प्रकार योग्य नाहीत. हे प्रकरण २००४ मधील आहे, तर गुन्हा २०१७ मध्ये का दाखल केला? भाजपा तीन वर्षे गप्प का होते? - रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते