रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत २२ जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना बाबा, तुम्ही लवकर घरी या... अशी आर्त साद घातली आहे. बेपत्ता जवानांचे कुटुंब काळजीत आहेत. बेपत्ता जवान राकेश्वर सिंह मनहास यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आपला नवरा घरी सुखरुप परतावा म्हणून विनंती केली आहे. सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आहे आणि आश्वासन दिले आहे की, बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे हे त्यांना ठाऊक आहे. त्यांची लवकरच सुटका केली जाईल.
राकेश्वर सिंह मनहास यांच्या लहानग्या मुलीला वडिलांची खूप आठवण येत असून, ते घरी आले नाही, म्हणून तिला अक्षरशः रडू कोसळत आहे. वडिलांच्या आठवणीने लहानगी रडत असून, बाबा, तुम्ही लवकर घरी या, अशी आर्त साद घातल्याचे पाहायला मिळत आहे. मुलीच्या या निरागस सादेमुळे आजूबाजूला असलेल्या उपस्थितांचे डोळेही नकळत पाणावले.
सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची शाह यांनी पाहणी केली. तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना, जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू. छत्तीसगडच्या जनतेला आणि देशवासीयांना आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहोचली असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी एकत्रित येत नक्षलवाद्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. तारेम येथून निघालेल्या एका पथकाची शनिवारी दुपारी जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांच्या एका गटाशी धुमश्चक्री उडाली. सुमारे तीन तासांपर्यंत ही धुमश्चक्री चालली होती. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी रात्री हाती लागले होते. १७ जवान मात्र बेपत्ता होते. रविवारी सुरक्षा दलांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली असता सर्व जवानांचे मृतदेह सापडले. या चकमकीत ३० जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.