नवी दिल्ली : ओडिशातील सत्ताधारी पार्टी बिजू जनता दलाचे नेते आणि खासदार जय पांडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. जय पांडा यांनी आपला राजीनामा ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांच्याकडे पाठविला आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात जय पांडा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले आहे. दरम्यान, याबाबत जय पांडा यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांना पत्र लिहिले आहे. मी खूप दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातच सध्याची बिजू जनता दलाची परिस्थीत चांगली नाही, असे सांगत जय पांडा यांनी लोकसभा अध्यक्षांना आपण राजीनाम्याबाबत माहिती देणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, जय पांडा यांना ज्यावेळी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरुन निलंबित करण्यात आले होते, त्यावेळीपासून ते बिजू जनता दल सोडणार असल्याची चर्चा होती.