गाझियाबादः उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये एक चमत्कारिक घटना घडली आहे. गाझियाबादमधल्या ठाकूरद्वाराच्या फ्लायओव्हरवरून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या छोटा टेम्पोनं एका बाइकस्वाराला धडक दिली. बाइकवरून एक दाम्पत्य आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली प्रवास करत होत्या. टेम्पोची धडक बसताच आईच्या हातातून ललिता ही चिमुकली फ्लायओव्हरवरून खाली पडली, पण त्या मुलीला साधं खरचटलंसुद्धा नाही. या अपघातात मुलीचे आई-वडील गंभीररीत्या जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.नगर कोतवाली परिसरात काल सकाळी पावणे नऊ वाजता ठाकूरद्वार फ्लायओव्हवर लोनी इंदिरापुरी कॉलनीतले रहिवासी मनोज कुमार स्वतःची पत्नी, मुलगीसह सासरी जात होते. ठाकूरद्वारा फ्लायओव्हर आले असता एका विरुद्ध दिशेनं येणाऱ्या टेम्पोनं त्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ललिता खाली पडली. पण रिया आणि ललिताला कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर फ्लायओव्हर आणि जीटी रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीतूनच त्या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.विशेष म्हणजे या अपघातात चार महिन्यांची ललिता ऊर्फ चेरीला साधं खरचटलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जेव्हा टेम्पोनं बाइकला धडक दिली, तेव्हा जवळपास 10 फुटांच्या उंचावरून चार महिन्यांची ललिता खाली कोसळली. एवढ्या उंचीवरून कोसळल्यानंतरही ती दुखापत झालेली नाही. मुलगी जमिनीवर कोसळताच उभे लोकांनी तिला लागलीच उचललं. त्या लहान मुलीला रडूदेखील कोसळलं नाही.
आश्चर्य! फ्लायओव्हरवरून पडूनही मुलीला खरचटलंसुद्धा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 9:28 AM