देशात काही ठिकाणी बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, याचा मोठा फटका चालकांनाही झाला आहे. असाच फटता दिल्लीतील बाईक टॅक्सी चालक आनंद राय यांनाही झाला. दिल्ली सरकारच्या कारवाईनंतर उत्तर प्रदेशातील आनंद राय हे आपल्या घरी परतले. बाईक टॅक्सी कंपन्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते पुन्हा दिल्लीत परतण्यावर विचार करत होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं त्यांना पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केलंय. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
दिल्ली सरकारनं केलेल्या कारवाईनंतर मी आझमगढला आलो. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मी पुन्हा दिल्लीला येण्याच्या विचारात होतो. परंतु ही वाईट बातमी आहे. मी काही दागिने गहाण ठेवून दुचाकी खरेदी केली होती. परंतु सद्यस्थितीत मला नाईलाजानं चारचाकी खरेदी करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा विचार करावा लागेल. नवभारत टाईम्सनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
आपल्याला पाच महिन्यांची मुलगी आहे. दिल्लीत आता कोणतंही काम नाही, त्यामुळे आपण इकडेच राहणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत बाईक टॅक्सीच्या माध्यमातून चांगली कमाई करत होतो. आता जर त्यांनी पुन्हा यावर निर्बंध घातले तर ग्राहक आणि आम्हाला नुकसान होतो. माझी पत्नी आणि अन्य कुटुंबीय गावीच राहतात आणि मी त्यांना पैसे पाठवतो. परंतु आता उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाला तर मी पुन्हा घरी जाईन आणि दुसरं काही करेन, असंही त्यांनी सांगितलं.