उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात लोकांना जीव गमवावा लागल्याच्या बातमीने दुखावलेल्या एका विद्यार्थ्याने हायटेक सिस्टीम आणली आहे. या विद्यार्थ्याने बाईक चालवण्यासाठी सेन्सरसह हेल्मेटचे कंट्रोलिंग यंत्र बनवले आहे. या कंट्रोलिंग यंत्राद्वारे कोणतीही व्यक्ती हेल्मेट न घालता बाईक सुरू करू शकत नाही. हेल्मेट घातल्यानंतरच बाईक चालवता येते. या विद्यार्थ्याने हेल्मेटला लावता येईल असं यंत्र बनवले आहे.
हेल्मेट डोक्यावर घातल्याबरोबर हे उपकरण सुरू होते, त्यानंतर बाईक सुरू होते. तसेच हेल्मेट काढताच ही बाईक पुन्हा थांबणार आहे. अरूण कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. अरूणने दिलेल्या माहितीनुसार, हे सेन्सरयुक्त हेल्मेट बनवण्यासाठी दोन वायरलेस उपकरणे वापरण्यात आली आहेत, ज्याची किंमत सुमारे 400 रुपये आहे. हे यंत्र हेल्मेटमध्ये बसवलेले आहे आणि वाहनाच्या इंजिनच्या बॅटरीला एक उपकरण बसवले आहे
हेल्मेटच्या आत एक पूश बटण आहे, जे घातल्यानंतर पूश बटण चालू होते आणि रिले सक्रिय होताच बाईक सुरू होण्यासाठी तयार होते. हे हेल्मेट डोक्यावरून काढताच बाईक आपोआप थांबते. या विद्यार्थ्याने हे उपकरण बनवण्यासाठी यूट्यूबची मदत घेतल्याचे सांगितले, त्यानंतर त्याने इतर अनेकांची मदत घेतली.
अधिक वाहन कंपन्यांनी हे हेल्मेट सेन्सरसह बाजारात आणल्यास रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळता येतील, असे या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. कॉलेजच्या एका कार्यक्रमात अरुण या विद्यार्थ्याने त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते. त्यांचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. राज्यस्तरावर हे उपकरण दाखवून नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"