नवी दिल्ली : पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीर विघटनवादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तिसऱ्या पक्षाची कोणतीही भूमिका राहणार नाही असे पाकला पुन्हा ठणकावले आहे. बासित यांनी सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुक व अन्य फुटीरवादी नेत्यांची भेट घेऊन पाकिस्तान राष्ट्रीय दिनाचे निमंत्रण दिले होते. अशा चर्चेला भारताचा आक्षेप आहे असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रियाही बासित यांनी दिली होती. अशा बाबींना मुद्दा बनवू नका, हेच मी भारतीय मीडिया मित्रांना सुचवू इच्छितो, असे ते दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.भारत सरकार स्वत:विषयी बोलणेच पसंत करते, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यावर अधिकृतरीत्या दिली आहे. हुर्रियत कॉन्फरन्ससंबंधी भारताच्या भूमिकेबद्दल कोणताही गैरसमज किंवा चुकीचे निवेदन द्यायला नको असे भारताने अनेक प्रसंगी वारंवार स्पष्ट केले आहे. भारत-पाकच्या मुद्यांबाबत केवळ आमच्या दोन देशांची भूमिका असेल, तिसऱ्या पक्षाला कोणतेही स्थान नसेल याचा मी पुनरुच्चार करू इच्छितो, असे भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले. बासित यांनी गेल्या वर्षी परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेच्या पूर्वसंध्येला हुर्रियत नेत्यांना भेटल्यानंतर ही बोलणी भारताने रद्द केली होती.पंधरवड्यापूर्वी बासित यांनी हुर्रियतचे जहाल नेते सय्यद अली शाह गिलानी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी इस्लामाबाद भेटीत सचिवस्तरावर केलेल्या चर्चेचा तपशील दिला होता. या पार्श्वभूमीवर मीरवाईज यांनी अब्दुल गनी भट, मौलाना अब्बास अन्सारी, बिलाल गनी लोन, आगा सय्यद हसन, मुसादिक आदिल व मुख्यार अहमद वाझा यांनी रविवारी बासित यांच्या निवासस्थानी रात्री चर्चा केली.विघटनवादी नेत्यांसोबत चर्चेला भारताचा आक्षेप आहे असे मला वाटत नाही. अशा बाबींना मुद्दा बनवू नका असे मी भारतीय मीडिया मित्रांना सुचवू इच्छितो.-अब्दुल बासित, पाक उच्चायुक्त भारत-पाकिस्तानच्या मुद्यांबाबत केवळ आमच्या दोन देशांची भूमिका असेल, तिसऱ्या पक्षाला कोणतेही स्थान नसेल याचा मी पुनरुच्चार करू इच्छितो.- प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते
द्विपक्षीय चर्चेत तिसऱ्याची लुडबूड नकोच
By admin | Published: March 24, 2015 2:12 AM