Bilkis Bano Case, Supreme Court : बिल्किस बानो प्रकरणातील तीन दोषी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. तिघांनीही आत्मसमर्पणासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. गोविंदभाई नाईक, रमेश रूपाभाई चंदना आणि मितेश चिमणलाल भट यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे मुदत वाढवून देण्याचे आवाहन केले आहे. तिन्ही दोषींच्या अर्जावर सुप्रीम कोर्ट शुक्रवारी सुनावणी करणार आहे.
दोषींच्या वकिलांनी सांगितले की, आत्मसमर्पण करण्याची वेळ रविवारी संपत आहे. न्यायालयाला विनंती आहे की लवकरच अर्जांवर विचार करून त्यावर सुनावणी करावी. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना म्हणाले की, आत्मसमर्पण करण्यासाठी आणि तुरुंगात अहवाल देण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करणारे तीन अर्ज आहेत, परंतु खंडपीठाची पुनर्रचना करावी लागेल. रविवारी वेळ संपल्यामुळे, रजिस्ट्री खंडपीठाच्या पुनर्रचनेसाठी CJI कडून आदेश मागणार आहे. खंडपीठाने सांगितले की अशा परिस्थितीत न्यायालय या प्रकरणावर उद्या सुनावणी करेल, जेव्हा सीजेआय खंडपीठाची पुनर्रचना करतील.
तिन्ही दोषींनी काय केला युक्तिवाद?
आजारपणाचे कारण देत गोविंदभाई नाईक यांनी आत्मसमर्पणाची मुदत ४ आठवड्यांनी वाढवण्याची मागणी केली आहे. रमेश रुपाभाई चंदना यांनी मुलाच्या लग्नाचे कारण देत, तर मितेश चिमणलाल भट यांनी सुगीचा हंगाम असल्याचे कारण देत आत्मसमर्पण करण्यासाठी ६ आठवड्यांची मुदत देण्याची मागणी केली आहे.
८ जानेवारी रोजी आपला निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी मुदतपूर्व निर्दोष सुटलेल्या ११ दोषींना दिलेली सुटका रद्द केली होती. न्यायालयाने दोषींना दोन आठवड्यांत कारागृहात शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यात आता आत्मसमर्पणासाठीची मुदत वाढवण्याची याचिका दाखल केली आहे.