नवी दिल्ली : मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीने (सीसीएस) अब्जावधी डॉलर्सच्या अमेरिकन बोर्इंग विमान कंपनीकडून २२ अॅपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि १५ शिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्सच्या सौद्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिका दौऱ्यावर जात असून त्यापूर्वी तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आला.या हेलिकॉप्टर्सच्या उत्पादन खर्चाबाबत २०१३ मध्ये चर्चा सुरू झाली होती. सुमारे अडीच अब्ज डॉलरच्या या सौद्याबाबत यावर्षी जूनमध्ये अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांच्या भारत दौऱ्यावर करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा होती. अॅपाचे हेलिकॉप्टरचा सौदा बोर्इंग कंपनीसोबत केला जाणार असून त्यावर वापरली जाणारी शस्त्रे, रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणांसाठी अमेरिकेशी करार केला जाईल. भारतात संरक्षण क्षेत्रातील वाढत्या बाजारात आपले अस्तित्व आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने या करारात स्वारस्य दाखविले आहे. सांकेतिक भाषा संशोधनशिक्षण आणि कार्यस्थळी किमान पन्नास लाख कर्णबधिरांना प्रवेश सुलभ व्हावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण संस्था उभारण्याला सरकारने मंजुरी दिली. मूक-बधिरांना प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना या बैठकीची माहिती देताना सांगितले. उच्च शिक्षणात विशेषत: संशोधन, कौशल्य विकास आणि शाखा विकासात जर्मनीसोबत संबंध बळकट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संयुक्त राष्ट्र अजेंड्यावर चर्चासंयुक्त राष्ट्राच्या सातत्यपूर्ण विकास २०३० या अजेंड्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करणारे भाषण पंतप्रधान मोदी देणार असून त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अब्जावधी डॉलरच्या हेलिकॉप्टर सौद्याला मंजुरी
By admin | Published: September 22, 2015 10:41 PM