नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टरच्या गंभीर अपघातात देशाचे संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त होत आहे. भारतात या आधीही असे अपघात घडले आहेत, ज्यात महत्त्वाच्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.
संजय गांधीमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि राजीव गांधी यांचे धाकटे बंधू संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे त्यावेळी देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. ही दुर्घटना २३ जून १९८० रोजी घडली. हे विमान संजय गांधी स्वत: चालवत होते.
माधवराव शिंदेकाँग्रेसचे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते माधवराव शिंदे यांचाही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात २००१ मध्ये सप्टेंबर महिन्यात झाला. माधवराव शिंदे तेथून एका सभेसाठी कानपूरला निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत अन्य पाच जण होते. या अपघातात सर्व सहाजणांचा मृत्यू झाला.
वाय. एस. राजशेखर रेड्डीआंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी आणि अन्य चारजणांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर नल्लामाला या वनक्षेत्रात गायब झाले. हा प्रकार २००९ मध्ये सप्टेंबरमध्ये घडला. लष्कराच्या मदतीने या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात आला. तीन सप्टेंबर रोजी या हेलिकॉप्टरचे अवशेष कुरनूलपासून ७४ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्रकोंडा या टेकडीवर आढळून आले.
दोरजी खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचाही मृत्यू एप्रिल २०११ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात झाला. हेलिकॉप्टरमधून दोरजी खांडू यांनी तवांग येथून उड्डाण केले होते. २० मिनिटांनंतर या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याचे लक्षात आले. चार दिवस या हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागला नव्हता. पाचव्यादिवशी बचावपथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आणि त्यात पाचजणांचे मृतदेह आढळून आले.
जी. एम. सी. बालयोगीलोकसभेचे माजी अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांचाही मार्च २००२ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यात झाला. बेल-२०६ या प्रकारातील खासगी हेलिकॉप्टरने बालयोगी त्यांचे सहायक आणि अंगरक्षकासह बसले होते. काही तांत्रिक बिघाड झाल्याने या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि त्यात बालयोगी मरण पावले.
ओ. पी. जिंदालप्रख्यात उद्योगपती आणि राजकीय नेते ओ. पी. जिंदाल यांचाही विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरिंदर सिंह आणि पायलटचाही मृत्यू झाला. चंदीगडहून हेलिकॉप्टरने दिल्लीला येत असताना एप्रिल २००५ मध्ये हा अपघात झाला.