नवी दिल्ली – तामिळनाडूच्या कुन्नूर इथं झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे चीफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात तेव्हा झाला ज्यावेळी हेलिकॉप्टर लँड करणार होते. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत हेलिकॉप्टर धुक्यातून बाहेर पडले आणि आकाशात दिसले. घटनास्थळी हवामान खराब असल्याचे काही सेकंदांच्या व्हिडिओवरून स्पष्ट होते.
या व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक दिसत आहेत. त्यांनीही हेलिकॉप्टरचा आवाज ऐकल्यावर त्याकडे पाहिले. विशेष म्हणजे डोंगरामधील हवामान कधीही बदलू शकते. तथापि, जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार होते तेव्हा ते सर्व पॅरामीटर्सवर तपासले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी ८.४७ मिनिटांनी पालम एअरबेसवरुन भारतीय वायूदलाचं विमान रवाना झालं होतं. सकाळी ११.३४ वाजता ते सुलुर एअरबेसला पोहचलं. सुलुरमधून सीडीएस रावत यांनी एमआय१७ व्ही ५ हेलिकॉप्टरमधून ११.४८ वाजता वेलिंगटन येथे उड्डाण घेतलं. त्यानंतर दुपारी १२.२२ मिनिटांनी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.
मृत्यूच्या दाढेतून परत आले होते बिपीन रावत
बिपिन रावत यांचा विमान अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. जनरल बिपिन रावत यांचं यापूर्वीही एकदा हेलिकॉप्टर कोसळले होते. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे चिता हेलिकॉप्टर दिमापूर, नागालँड येथे क्रॅश झाले होते. बिपीन रावत तेव्हा लेफ्टनंट जनरल होते. बिपिन रावत दिमापूर येथील लष्कराच्या ३ कोरच्या मुख्यालयाचे नेतृत्व करत असताना फेब्रुवारी २०१५ मध्ये ही घटना घडली होती. आपल्या चिता हेलिकॉप्टरने दिमापूरहून निघाले असताना अचानक काही उंचीवर त्यांचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर कोसळले. त्यावेळी या घटनेमागचे कारण इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जनरल रावत किरकोळ जखमी झाले होते.
ब्लॅक बॉक्सही सापडला
कुठल्याही प्लेन अथवा हेलिकॉप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग ब्लॅक बॉक्स असतो. हे विमान आणि हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळच्या सर्व हालचाली रेकॉर्ड करत असतं. पायलट आणि ATC यांच्यातील संवादही रेकॉर्ड होतो. पायलट आणि को पायलट यांच्यातील संवाद रेकॉर्ड होतो. कुन्नूर येथील दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यामुळे अपघाताचं खरं कारण आता समोर येण्याची शक्यता आहे.
चॉपरमध्ये कोण कोण होतं?
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते.