कुन्नूर: तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. त्यामध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि लष्कराच्या ११ जणांचं निधन झालं. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर दुर्घटनास्थळी भयावह परिस्थिती होती. घटनेचा माहिती मिळताच बचाव दल पोहोचलं. मात्र त्याआधी स्थानिकांनी मदतकार्य सुरू केलं होतं. या भीषण अपघातात चॉपरमधील १४ पैकी १३ जणांचा दुर्दैवी अंत झाला.
सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि लष्कराच्या ११ जणांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातातून ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ४५ टक्के भाजले असल्यानं त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या वेलिंग्टनच्या लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती पाहता त्यांना बंगळुरूतील कमांड रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत चॉपर अपघाताची माहिती दिली. 'काल दुपारी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यामध्ये सीडीएस बिपिन रावत होते. विलिंग्टनला असलेल्या डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजला जात असताना रावत यांच्या चॉपरला अपघात झाला. रावत यांना घेऊन जात असलेल्या चॉपरनं दुपारी ११ वाजून ४८ मिनिटांनी सुलूर बेसवरून उड्डाण केलं होतं. वेलिंग्टनमध्ये ते १२ वाजून १५ मिनिटांनी पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र १२ वाजून ८ मिनिटांनी चॉपरचा संपर्क तुटला,' अशी माहिती सिंह यांनी दिली.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृती गंभीर आहे. ते लाईफ सपोर्टवर आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असं सिंह यांनी सांगितलं. गरज पडल्यास वरुण यांना वेलिंग्टनमधील लष्करी रुग्णालयातून बंगळुरूतील कमांड रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.