भारताचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. त्यांची पत्नी, हवाई दलाचे चार अधिकाऱ्यांसह सात लष्करी अधिकाऱ्यांचे या अपघातात निधन झाले. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना अशावेळी घडली जेव्हा भारत आणि चीनमध्ये गेल्या दीड वर्षापासून संबंध ताणले गेले आहेत. तज्ज्ञांनी देखील हा काळ आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.
संरक्षण विषयातील तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी यावर भाष्य केले आहे. चीनसोबत गेल्या 20 महिन्यांपासून सीमेवर तणाव आहे. हिमालयात युद्धाची परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीत रावत यांचा अपघाती मृत्यू होणे यापेक्षा वाईट वेळ असूच शकत नाही, असे चेलानी यांनी म्हटले आहे. याचबरोबर चेलानी यांनी रावत यांच्या या अपघाताचा गेल्या वर्षी तैवानच्या एका विमान अपघाताशी जोडला आहे.
चेलानी यांनी यासबंधी ट्विट केले आहेत. तैवानचे लष्कर प्रमुख शेन यी-मिंग आणि दोन प्रमुख जनरल यांच्यासह सात जणांचा गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना आणि आजची रावत यांच्या हेलिकॉप्टरची घटना समान आहे. प्रत्येक हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीनविरोधी आक्रमक असलेल्या प्रत्येक प्रमुख लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू होतो, असे चेलानी यांनी म्हटले आहे.
या विचित्र समानतेचा असा अर्थ नाहीय की दोन्ही हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये काही परस्पर संबंध असेल किंवा कोणत्या बाहेरील शक्तीचा हात असेल. प्रत्येक अपघाताने महत्वाचे अंतर्गत प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषत: प्रमुख जनरल अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या मेन्टेनन्सबाबत. रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण शोधण्याची गरज आहे, असे चेलानी म्हणाले.