तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरी जंगलात भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 14 जण प्रवास करत होते. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले आहेत. चार गंभीर जखमींवर वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. कमी दृष्यमानतेमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन पडलेल्या ठिकाणी लष्कराचे अधिकारी पोहोचले आहेत. हे हेलिकॉप्टर पडताना पाहिलेल्या एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने घटनेचे गांभीर्य सांगितले आहे. त्याचे नाव कृष्णासामी आहे. ''अचानक एक मोठा आवाज ऐकला. यामुळे घरातून बाहेर आलो तेव्हा एक हेलिकॉप्टर एका झाडावर आदळून दुसऱ्या झाडावर आदळत पेटले. जेव्हा ते आदळत होते तेव्हा त्याला आग लागली होती. याचवेळी 2-3 जण त्या हेलिकॉप्टरमधून उडी मारत होते. सर्वांचे शरीर आगीने वेढलेले होते.'', असे कृष्णासामीने म्हटले.
यामुळे हादरलेल्या कृष्णासामीने आपल्या साथीदारांना एकत्र केले आणि बचाव कार्य सुरु केले. जेवढे मृतदेह मिळाले होते, ते 80 टक्के भाजलेले होते. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. दरम्यान, राजनाथ सिंहांनी दिल्लीतीव रावत यांच्या निवासस्थानी भेट दिली. यानंतर ते संसदेकडे रवाना झाले. लोकसभेत ते या दुर्घटनेची माहिती देणार आहेत.