नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात भारताचे पहिले CDS जनरल बिपीन आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले. कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. भारतीय वायुसेनेने या अपघाताची माहिती दिली. बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही रावत यांना आदरांजली वाहिली.
भारताने मातृभूमीची निष्टेने सेवा करणारा सच्चा सैनिक गमावल्याची भावना शहांनी व्यक्त केली. ट्विटरवर गृहमंत्री अमित शाह यांनी लिहिले- 'आज देशासाठी एक अतिशय दुःखद दिवस आहे. भारताने सीडीएस जनरल बिपिन रावत जी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले. मातृभूमीची अत्यंत निष्ठेने सेवा करणाऱ्या शूर सैनिकांपैकी ते एक होते. त्यांचे देशाबद्दलचे योगदान आणि वचनबद्धता शब्दात वर्णन करता येणार नाही.'
राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावनाभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही रावत यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाने एक पराक्रमी पूत्र गमावला, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सर्व अधिकाऱ्यांचे निधन झाले हे वेदनादायी आहे. जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा केली, जी शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना, असे ट्विट कोविंद यांनी केले आहे.
नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजलीजनरल बिपीन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, ज्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन महत्वपूर्ण होते. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती, अशा शब्दांत मोदींनी बिपीन रावत यांना आदरांजली वाहिली.