कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम हत्याकांडप्रकरणी सीबीआयने २२ आरोपींच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. गेल्या मंगळवारी बोगतुई या गावी सहा महिला व दोन मुलांना काहीजणांनी मारहाण केली व जिवंत जाळले होते. या प्रकरणी राज्य पोलिसांनी २० जणांना या आधीच अटक केली होती. बीरभूम हत्याकांडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अनारूल हुसैन यांची सीबीआयने चौकशी केली.
बीरभूम हत्याकांडात आठजणांना घरात कोंडण्यात आले व घरांना आग लावण्यात आली. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता भादू शेख याचा बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेचा बदला घेण्यासाठी बीरभूम हत्याकांड घडविण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्याचीही सीबीआय चौकशी करणार आहे. पोलिसांनी अटक केलेले २० जण व सीबीआयने आरोपी म्हणून तपासकामात नोंदविलेली नावे यात फारसा फरक नाही, असे सूत्रांनी सांगितले. हत्याकांडानंतर बोगतुई गावाला दिलेल्या भेटीदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, गुन्हा रोखण्यासाठी पोलिसांना मदत न केल्याच्या आरोपाखाली अनारूल हुसैन यांना अटक केली जाईल. मात्र, सीबीआय हुसैन यांची चौकशी करीत असल्याबद्दल प्रश्न विचारताच, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, विरोधकांनी आमच्या विरोधात कट रचला आहे.
बीरभूम हत्याकांडाची चौकशी सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी अखिलेश सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथक करीत आहे. सोना शेख या महिलेचे घर जाळण्यात आले होते. हत्याकांडातील बहुतांश लोकांचे मृतदेह याच घरात हाती लागले होते. त्या घराची सीबीआय पथकाने पाहणी केली.
७ एप्रिलला देणार तपासाचा स्थितीदर्शक अहवालबीरभूम हत्याकांडाबाबत केलेल्या तपासाचा स्थितीदर्शक अहवाल सीबीआयला ७ एप्रिलपर्यंत कोलकाता उच्च न्यायालयाला सादर करायचा आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश या न्यायालयाने दिले. बीरभूम हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवू नका, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाकडे केली होती.