वास्को (गोवा) : दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच विमानतळावरील धावपट्टीवर एअर इंडिया विमानाच्या पंख्यात एक कबुतर अडकले. मात्र पायलटने प्रसंगावधनाने बे्रक लावल्याने विमानातील ३ लहान मुलांसह १६४ प्रवासी बचावले़मंगळवारी सकाळी ७़२० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ एअर इंडियाचे विमान मुंबईमार्गे दाबोळी-गोवा विमानतळावरून नवी दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते़ धावपट्टीवरून वेग घेत असतानाच या विमानाच्या इंजिनात एक पक्षी अडकला़ इंजिनाला पक्ष्याने धडक दिल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले़ त्याने प्रसंगावधानाने विमानाला ब्रेक लावून विमान थांबविले़ विमानातील सहवैमानिकाने नियंत्रण कक्षाला तसेच विमानतळावरील आपत्कालिन सेवेला धोक्याचा इशारा दिल्यावर नौदलाचे अग्निशामक दल तसेच रूग्णवाहिका, प्रवाशांना उतरण्यासाठी शिडी, प्रथमोपचार पथक त्वरित घटनास्थळी हजर झाले़ अचानत ब्रेक लावल्याने काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या़ विमानातील प्रवाशांना अधिकाऱ्यानी येथील काही हॉटेल्समध्ये नेले, तर काहींची इतर विमानाद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यात आली़ दुपारपर्यंत सर्व प्रवासी मुंबई तसेच दिल्लीला रवाना झाले.
गोव्यात विमानाला पक्ष्याची धडक
By admin | Published: November 19, 2014 4:46 AM