कोरोना महामारीच्या दहशतीमध्येच बर्ड फ्लूमुळे आता लोकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे 1800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील सरकारी पोल्ट्री सेंटरमध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे 1800 कोंबड्यांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरकारी कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूच्या व्हायरसचा H5N1 प्रकार आढळून आला आहे. हे केंद्र जिल्हा पंचायतीमार्फत चालवले जाते. अधिकाऱ्याने सांगितले की, केरळच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत नियमांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पशुसंवर्धन मंत्री जे चिंचू रानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने केलेल्या प्रोटोकॉलनुसार बर्ड फ्लूचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. प्राथमिक तपासणीत सरकारला बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, व्हायरसचा नमुना अचूक चाचणीसाठी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
ज्या सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूमुळे 1800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता, तिथे 5000 हून अधिक कोंबड्या होत्या. आता उरलेल्या कोंबड्याही नष्ट करण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शासनाच्या समन्वयाने आजार रोखण्यासाठी तयारी सुरू आहे. यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"