जयपूरकोरोनाचं संकट असताना राजस्थानमध्ये आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारची आता झोप उडाली आहे.
राजस्थानातील हाडोती भागात तर १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय. राजस्थान सरकार आता अलर्ट झालं असून राज्याचे पशूसंवर्धन मंत्री लालचंद कटारिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. संपूर्ण घटनेवर आमचं पूर्णपणे लक्ष असून यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं कटारिया म्हणाले.
हाडौतीमध्ये कहरराजस्थानच्या हाडौती भागात बर्ड फ्लूमुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यात झालवाड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कावळे मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमध्ये ८, तर मथना गावात १९ कावळे मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं आहे. आतापर्यंत कोटा, बारां, झालावाड, नागौर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये मिळून ३०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
माणसाला लागण होण्याचा धोकापशु चिकित्सकांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एका पक्ष्यातून दुसऱ्या पक्ष्याला जर या फ्लूची लागण होत आहे. तर मनुष्यप्राण्यालाही याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.