नवी दिल्ली - केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायत मधून बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रसार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली आहे. याबाबत सूचना मिळताच अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात एक किलोमीटरपर्यतच्या भागातील बदके, कोंबड्या यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. फ्लूच्या प्रकोपाची सूचना मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पशूपालन, आरोग्य आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली.
बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने थाकाझी ग्राम पंचायत वॉर्ड क्रमांक 10 जवळील एक किमी भागातील सर्व बदके, कोंबड्या यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. संक्रमण पसरू नये म्हणून प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लू असलेल्या भागातील कोंबड्या, बदके आणि अंडी, मांस आदीच्या विक्रीवर बंदी आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रीकुन्नपुझा, थकाझी, पुरक्कड़, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर हरिप्पड नगरपालिका भागात प्रतिबंध लावण्यात आले आहेत.
5 दिवसांत 60 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू
प्रशासनाने या भागातील पक्ष्यांना पकडणे आणि त्यांना नष्ट करण्यासाठी पशूपालन विभागाची एका टीम तयार केली आहे. हवेतून हा व्हायरस वेगाने पसरत असून पक्षांना संक्रमित करत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातून कमीत कमी 48 कावळे मृत अवस्थेत आढळल्यानंतर यात एच5 एन8 व्हायरस म्हणजेच बर्ड फ्लूची पुष्टी झाली होती. याशिवाय राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातूनही बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत. ज्यात 5 दिवसांत 60 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.