पक्ष्यांचा बळी घेणारा बर्ड फ्लू आता माणसांसाठीही धोकादायक बनत चालला आहे. याच दरम्यान भारतात धोक्याची घंटा वाजली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका चार वर्षांच्या मुलाला H9N2 व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लूमुळे लहान मुलं आजारी पडण्याची ही पहिलीच घटना आहे.
डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला म्हणजेच 4 वर्षांच्या मुलाला श्वास घेण्यास सतत त्रास होत होता. मुलाला खूप ताप आणि पोटदुखीचा त्रास होता. त्यानंतर, फेब्रुवारीमध्ये त्याला हॉस्पिटलच्या बालरोग अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आलं होतं. जवळपास 3 महिने तपासणी आणि उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जागतिक आरोग्य एजन्सीने सांगितलं की, रुग्णाच्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात कोंबड्या होत्या आणि मुलगा त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्याला बर्ड फ्लूची लागण झाली. WHO ला त्याच्या कुटुंबात किंवा परिसरातील इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये श्वसनाच्या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की जेव्हा ही लक्षणे मुलामध्ये आढळून आली तेव्हा लसीकरण आणि उपचारांबाबत कोणताही तपशील उपलब्ध नव्हता. भारतातील माणसांमध्ये H9N2 बर्ड फ्लूची ही दुसरी घटना आहे. पहिली केस 2019 मध्ये नोंदवली गेली होती.
H9N2 हा एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसपैकी एक आहे. हा व्हायरस सामान्यतः एका सौम्य आजाराचं कारण ठरतो. युनायटेड नेशन्स एजन्सीने म्हटलं आहे की अनेक भागात पोल्ट्री फार्मचा प्रसार झाल्यामुळे हा व्हायरस माणसांसाठीही आता धोकादायक ठरू शकतो.