ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - आकाशात उडणे हा पक्ष्यांचा मुलभूत अधिकार असून हा अधिकार कोणीही हिरावू शकत नसल्याने त्यांना पिंज-यात ठेवता येत नाही असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली हायकोर्टाने मांडले आहे. पक्ष्यांची योग्य आहार, पाणी व वैद्यकिय मदतीशिवाय विदेशात होणा-या निर्यातीवरही हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील पीपल्स फॉर अॅनिमल या प्राणीप्रेमी संघटनेने पक्ष्याला पिंज-यात ठेवणा-या मालकाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी पक्ष्यांना पिंज-यात ठेवणा-या मोहम्मद मोहाज्जिम यांना सोडून दिल्याने संघटनेने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने पक्ष्यांना पिंज-यात ठेवता येत नाही असे म्हटले आहे. कनिष्ठ न्यायालयाने पक्ष्यांचे मालक मोहम्मद मोहाज्जिम यांना सोडून दिले होते. हायकोर्टाने हा निर्णय रद्द करत मोहाज्जिम यांना नोटिस बजावत त्यांच्याकडून २८ मेपर्यंत उत्तर मागवले आहे. आकाशात उडणे हा प्रत्येक पक्ष्यांच मुलभूत अधिकार आहे, कोणताही व्यक्ती पक्ष्यांचा हा अधिकार हिरावू शकत नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. पक्ष्यांचा व्यापार करणे हे त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे, पक्षी सहानूभूतीस पात्र असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची क्रूरता करता येत नाही असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.