अहमदाबाद : मुंबईहून दिल्लीला जाणा-या विमानाचे अपहरण करण्याची धमकी देणारा सराफा बिरजू किशोर सल्ला (३७) याला पोलिसांनी अटक केली. मात्र, या अपहरण नाट्यामागे प्रेम प्रकरणाचे कारण असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. हा व्यक्ती या विमान कंपनीतील दिल्लीतील एका कर्मचारी तरुणीसोबत प्रेम करत असून तिला कायमस्वरुपी मुंबईला आणण्यास हा खटाटोप केल्याचेही उघड झाले आहे.पोलिसांनी सांगितले की, विमान अपहरण विरोधी अधिनियमानुसार त्याला अटक करण्यात आली असून या नियमानुसार करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे. यानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि त्याची संपत्ती जप्त होऊ शकते. याबाबत आम्ही राष्ट्रीय एजन्सीच्या संपर्कात आहोत. जर केंद्राने ठरविले तर प्रकरण एनआयएकडे सोपविले जाऊ शकते.कोण आहे बिरजू किशोर सल्ला?बिरजू हा करोडपती ज्वेलर्स आहे. त्याचा मुंबईच्या उच्चभ्रू भागात फ्लॅट आहे. तो मूळचा गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील देदन गावचा रहिवासी आहे. जेट एयरवेजची या मार्गावरील सेवा बंद व्हावी, या उद्देशाने त्याने ही चिठ्ठी लिहिली होती. जेणेकरुन कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयात काम करणारी त्याची प्रेयसी नोकरी सोडून त्याच्यासोबत मुंबईत राहण्यासाठी येईल.
प्रेयसीसाठी विमान अपहरणाची धमकी, मुंबईत राहणारा सोनेव्यापारी बिरजू सल्ला याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:59 AM